Marathi FAQs

Marathi FAQs

English FAQs

एच.आय.व्ही. म्हणजे काय?…

एच.आय.व्ही. म्हणजे काय?…

हे एड्स होण्‍याला कारण असलेल्‍या विषाणूचे नाव आहे. ‘ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस’ या इंग्रजी नावाचे लहान रूप म्हणजे एच.आय.व्ही. हा विषाणू शरीरात शिरल्यावर प्रतिकारशक्‍ती हळूहळू कमी होऊ लागते.

एड्स म्हणजे काय?…

एड्स म्हणजे काय?…

एड्स म्हणजे ‘अ‍ॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम’. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे शरीराला ग्रासणार्‍या विविध आजारांच्या समूहाला एड्स असे म्हणतात.

एच.आय.व्ही.ची लागण कशी होऊ शकते?…

एच.आय.व्ही.ची लागण कशी होऊ शकते?…

 • एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध आले तर त्यातून एच.आय.व्ही असलेले लैंगिक स्राव दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. अशा प्रकारे दुसर्‍या व्यक्तीला लागण होण्याची शक्यता असते.
 • एच.आय.व्ही.ने दूषित रक्त दुसर्‍या व्यक्तीस भरले गेल्यास लागण होऊ शकते.
 • इंजेक्शन घेताना अथवा शिरेवाटे मादक द्रव्य टोचून घेताना एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी वापरलेल्या सुया निर्जंतुक न करता वापरल्यास, दुसर्‍या व्यक्तीला एच.आय.व्ही.ची लागण होऊ शकते.
 • एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढणार्‍या गर्भाला, गर्भाशयात असतानाच किंवा बाळंतपणात किंवा त्या बाळाला जन्मानंतर आईच्या दुधातून एच.आय.व्ही.ची लागण होण्याची शक्यता असते.

     वरील मार्गांव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने एच.आय.व्ही.ची लागण होत नाही.

एच.आय.व्ही.ची लागण झाल्यावर म्हणजेच या विषाणूंचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर काय होते?…

एच.आय.व्ही.ची लागण झाल्यावर म्हणजेच या विषाणूंचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर काय होते?…

रोगप्रतिकारासाठी आपल्या शरीरात पांढर्‍या पेशी काम करत असतात. ह्या पेशी वेगवेगळ्या रोगांपासून आपले संरक्षण करतात. या कामात पांढर्‍या पेशींमधील सी.डी.4 नावाच्‍या पेशींचे काम महत्‍त्‍वाचे असते. एच.आय.व्ही. शरीरात गेल्यावर या सी.डी.4 पेशींमध्ये शिरतात आणि पेशी-यंत्रणेचा वापर स्वतःच्या पुनरुत्पादनासाठी करतात. त्यामुळे सी.डी.4 पेशी मरतात. विषाणू मात्र वाढत जातात. सी.डी.4 या रोगप्रतिकारक पेशींची संख्या कमी झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी कमी होत जाते.

रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे काय होते?…

रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे काय होते?…

रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर इतर संसर्गजन्य रोगांच्या जंतुंना शरीराकडून पुरेसा विरोध होत नाही. अशा व्यक्तीला वारंवार जुलाब, सर्दी, खोकला, ताप, ज्वर, क्षयरोग, नागीण, असे वेगवेगळे आजार होऊ लागतात.

एखाद्या व्यक्तीला एच.आय.व्ही. आहे हे कसे ओळखावे?…

एखाद्या व्यक्तीला एच.आय.व्ही. आहे हे कसे ओळखावे?…

कोणत्याही व्यक्तीकडे बघून तिला लागण आहे किंवा नाही हे ओळखण्याची कुठलीही खूण नाही. निश्चित आणि खात्रीलायक निदानासाठी त्या व्यक्तीच्या रक्ताची तपासणीच करायला हवी. एलायझा या तंत्राने केली जाणारी अॅन्टी एच.आय.व्ही. तपासणी करून हे निदान केले जाते.

एच.आय.व्ही.चे निदान कसे होते?…

एच.आय.व्ही.चे निदान कसे होते?…

एच.आय.व्ही.साठी सामान्यपणे केली जाणारी रक्ताची तपासणी एलायझा या तंत्रावर आधारित आहे. अशी तपासणी केल्यावर निकाल जर ‘सदोष’ (म्हणजे रक्तात एच.आय.व्ही. आहे असे सुचवणारा) आला तरीही तो खात्रीशीर मानला जात नाही. खात्रीशीर निदानासाठी त्याच तपासणीचे वेगळ्या प्रकारचे संच वापरून आणखी दोन वेळा (एकूण तीन वेळा) रक्त तपासले जाते. तीनपैकी किमान दोन तपासण्यांचे निकाल सदोष आल्यास एच.आय.व्ही.ची लागण असल्याचे निदान खात्रीशीर समजले जाते. खात्रीशीर निदानासाठी वेस्टर्न ब्लॉट नावाची एक तपासणीही करता येते; मात्र ती बरीच जास्त महागडी असल्याने व त्‍यातून वेगळा काही फायदा नसल्याने सर्वसाधारणपणे ही तपासणी करण्याची गरज नसते.

एच.आय.व्ही.चे निदान झाल्यावर त्या व्यक्तीने काय करायला हवे?…

एच.आय.व्ही.चे निदान झाल्यावर त्या व्यक्तीने काय करायला हवे?…

एच.आय.व्ही. असल्याचे निदान झाल्यावर तज्‍ज्ञ-डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करून आपल्या प्रतिकारशक्तीची पातळी (वर उल्लेखलेल्या सीडी4 पेशींचे रक्तातील प्रमाण) किती आहे ते तपासायला हवे. त्‍याबरोबरच क्षयरोगासारख्या इतर आजारांची शक्यता तपासून घ्यायला हवी. आपली प्रकृती, सीडी4चे प्रमाण यावरून एच.आय.व्ही.ला प्रतिबंध करणारी औषधे सुरू करण्याची गरज आहे किंवा नाही हे डॉक्टरांना ठरवता येते. सीडी4 तपासणी यानंतरच्या जीवनात नियमितपणे करत राहायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी व उपचार सुरू ठेवावेत.

ह्या आजारावर काही उपाय आहे का?…

ह्या आजारावर काही उपाय आहे का?…

होय. एच.आय.व्ही. नियंत्रणात ठेवण्यासाठी आता प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. त्यांना ‘अँटीरेट्रोव्हायरल ट्रिटमेंट’ (ए.आर.टी.) असे म्हणतात. या औषधांमुळे आजार पूर्णपणे बरा होत नसला तरी तो नियंत्रणात ठेवून उत्तम आयुष्य जगता येते. मात्र ही औषधे एकदा सुरू केली की कायमस्वरूपी, म्हणजे आयुष्यभर व अतिशय नियमितपणे घ्यावी लागतात.  

ए.आर.टी. औषधे शरीरात गेल्यावर एच.आय.व्ही.वर नेमके कशाप्रकारे नियंत्रण मिळवतात?…

ए.आर.टी. औषधे शरीरात गेल्यावर एच.आय.व्ही.वर नेमके कशाप्रकारे नियंत्रण मिळवतात?…

एच.आय.व्ही.ची पुनरुत्पादन प्रक्रिया सी.डी.4 पेशींच्या आत होत असताना ए.आर.टी. औषधे त्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण करतात. त्यामुळे नवीन विषाणू तयार होण्याचे प्रमाण कमी होते व त्यांची संख्या नियंत्रणात रहायला मदत होते. शरीरातील विषाणू नियंत्रणात राहिल्यामुळे साहजिकच प्रतिकारशक्ती सुधारते व आजारही होत नाहीत.  

ए.आर.टी. औषधे कधी सुरू करावीत?…

ए.आर.टी. औषधे कधी सुरू करावीत?…

आपल्या देशात वापरल्या जाणार्‍या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शरीरातील सी.डी.4 नावाच्या पांढर्‍या पेशींचे प्रमाण 350 प्रति मि.ली. किंवा त्यापेक्षा कमी झाल्याचे दिसल्यावर ए.आर.टी. औषधे सुरू केली जातात.

मात्र ही औषधे वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे ती तज्‍ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

‘अमूकतमूक औषधांनी एच.आय.व्ही./एड्स पूर्ण बरा होऊ शकतो’ असे सांगणार्‍या वेगवेगळ्या जाहिराती आजकाल पहायला मिळतात. त्यातले कोण खरे वा खोटे, हे कसे ठरवायच…

‘अमूकतमूक औषधांनी एच.आय.व्ही./एड्स पूर्ण बरा होऊ शकतो’ असे सांगणार्‍या वेगवेगळ्या जाहिराती आजकाल पहायला मिळतात. त्यातले कोण खरे वा खोटे, हे कसे ठरवायच…

एच.आय.व्ही/एड्स पूर्णपणे बरा करणारे असे एकही औषध आजमितीला कोणत्याच वैद्यकशाखेला सापडलेले नाही. त्यामुळे अशा जाहिरातींवर विश्वास ठेवूच नये. अशा जाहिराती लोकांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन पैसा उकळण्यासाठीच दिल्या जातात, आणि कायद्यातील त्रुटींमुळे त्यांचा पुरेसा बंदोबस्त करता न आल्याने सुरू राहतात.

प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी काही इतर उपाय आहेत का?…

प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी काही इतर उपाय आहेत का?…

सर्वसाधारणपणे सर्वांनीच कराव्यात अशा चौरस आहार, नियमित व्यायाम व गरजेनुसार विश्रांती या गोष्टी एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या व्यक्तींनी जरूर कराव्यात, याचा नक्कीच फायदा होईल. या व्यतिरिक्त पारंपरिक किंवा घरगुती उपाय, योगासने, प्राणायाम यासारख्या गोष्टींचाही प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्‍याचबरोबर शरीराला हानीकारक सवयी व व्‍यसने टाळायला हवीत.

ए.आर.टी. औषधे घेत असताना काय काळजी घ्यायला हवी?…

ए.आर.टी. औषधे घेत असताना काय काळजी घ्यायला हवी?…

 • ही औषधे एकदा सुरू केली की कायमस्वरूपी म्हणजे आयुष्यभर घ्यायला हवीत.
 • औषधे अगदी नियमित व ठरलेल्या वेळेतच घ्यावीत.
 • काही औषधे पोटात अन्न असताना तर काही रिकाम्या पोटावर घेतली असता अधिक प्रभावी ठरतात. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार ही औषधे जेवणापूर्वी अथवा जेवणानंतर घ्यायची आहेत ते समजावून घेऊन त्यानुसार घ्यावीत.
 • बरे वाटू लागल्यावर अनेकजण औषधोपचार बंद करतात किंवा कमी करतात, तसे ए.आर.टी.बाबत कधीही करू नये.
 • डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय औषधांच्या मात्रेमध्येही आपल्‍याच मनानी फरक करू नये. 
 • औषधांचे काही दुष्परिणाम जाणवल्यास मात्र त्वरित डॉक्टरांना कळवावे.
 • औषधे योग्यप्रकारे काम करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी सी.डी.4ची तपासणी दर सहा महिन्यांनी नियमितपणे करावी. 
 • ए.आर.टी. चालू असताना कोणतीही व्यसने नसावीत, विशेषत: दारू आणि काही ए.आर.टी. औषधे एकमेकांसह शरीरात गेल्यास त्यांचे घातक परिणाम होतात.

ए.आर.टी. नियमितपणे घेतली नाही तर काय होते?…

ए.आर.टी. नियमितपणे घेतली नाही तर काय होते?…

ही औषधे घेण्यामध्ये हेळसांड झाली, औषधे नियमित घेतली नाहीत तर शरीराच्या दृश्टीने पाहिले तर काही काळ शरीरात औषधे असतात, तर काही काळ नसतात. नियमितपणे औषधे शरीरात जात असतील तर विषाणूंना औषधे विरोध करतात, विषाणूंचे प्रमाण कमीकमी करत नेतात. औषधे अनियमित झाली की विषाणूंसाठी ही लढाई सोपी होते. शिवाय त्या विशिष्ट औषधांशी कसे लढायचे याची तयारी करण्यासाठी विषाणूंना वेळ सापडतो. हे विषाणू अशा पध्द्तीचे बदल स्वत:त करण्यात अतिशय वाकबगार असतात. कालांतराने त्या औषधाला विषाणू दाद देईनासे होतात.

एच.आय.व्ही.ची लागण झालेल्या व्यक्तीचे आयुष्य ए.आर.टी. औषधांनी किती वर्षांनी वाढू शकते?…

एच.आय.व्ही.ची लागण झालेल्या व्यक्तीचे आयुष्य ए.आर.टी. औषधांनी किती वर्षांनी वाढू शकते?…

आजवरच्या अनुभवातून असे दिसते की ए.आर.टी. औषधांमुळे जवळजवळ सामान्य आयुर्मर्यादा गाठणे आता प्रौंढांमध्‍ये तर नक्‍की शक्य झालेले आहे. मात्र औषधे आजाराच्या कोणत्या टप्प्यावर सुरू केली, विषाणूंवर त्या औषधांचा प्रभाव होतो आहे ना हे तपासले आहे ना, औषधे अत्यंत नियमितपणे घेतली गेली आहेत ना, अशासारख्या काही गोष्टींवरही हे अवलंबून असते. 

ए.आर.टी. औषधांची किंमत किती असते?…

ए.आर.टी. औषधांची किंमत किती असते?…

ए.आर.टी. औषधे आता जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच सरकारमार्फत काही इतर दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहेत.

प्रयास अमृता क्लिनिकमध्ये ही औषधे बाजारभावापेक्षा खूपच सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. या औषधांचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामुळे किंमतीतही तसेच वैविध्य आहे. बाजारातील दुकानांमध्ये या किंमती एका महिनाभराच्या औषधांसाठी रू. 1000 ते रू. 20,000 अशा आहेत. काही औषधे त्याहूनही महाग आहेत.

सरकारी व्यवस्थेमध्ये मिळणारी मोफत औषधे दर्जात थोडी कमी पडतात का?…

सरकारी व्यवस्थेमध्ये मिळणारी मोफत औषधे दर्जात थोडी कमी पडतात का?…

सरकारी व्यवस्थेमध्ये मिळणारी औषधे बाजारात मिळणार्‍या औषधांइतकीच चांगली व दर्जेदार असतात.

एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या गरोदर-मातेने जन्म दिलेल्या सर्व बाळांना एच.आय.व्ही.ची लागण होतेच का?…

एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या गरोदर-मातेने जन्म दिलेल्या सर्व बाळांना एच.आय.व्ही.ची लागण होतेच का?…

नाही. आईकडून बाळाला लागण होण्याची शक्यता साधारणत: 25-30% इतकीच असते, म्हणजेच एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या चार गरोदर स्त्रिया असतील तर त्यातल्या फक्त एकीच्याच बाळाला ही लागण झाल्याची दिसेल.

आईकडून बाळाला होऊ शकणारी ही 25-30% लागणीची शक्यताही आता टाळता येऊ शकते.


 

आईकडून बाळाला ही लागण कधी होते?…

आईकडून बाळाला ही लागण कधी होते?…

बाळ आईच्या पोटात असताना, बाळंतपणादरम्यान किंवा बाळाच्या जन्मानंतर स्तनपानातूनही बाळाला एच.आय.व्ही.ची लागण होऊ शकते.

आईकडून बाळाला होऊ शकणारी एच.आय.व्ही.ची लागण टाळणे शक्य आहे का?…

आईकडून बाळाला होऊ शकणारी एच.आय.व्ही.ची लागण टाळणे शक्य आहे का?…

हो. आईकडून बाळाला होऊ शकणारी एच.आय.व्ही.ची लागण आता बर्‍यापैकी टाळता येऊ शकते. ही लागण टाळण्यासाठी आता खूप प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. योग्यवेळी, योग्य व नियमित घेतलेल्या औषधोपचारांनी लागणीची ही शक्यता आता अगदी 1 ते 2% पर्यंत कमी करता येते.

प्रयास संस्थेच्या ‘आईकडून बाळाला होऊ शकणारी एच.आय.व्ही.ची लागण टाळण्यासाठी’च्या प्रकल्पाअंतर्गत ही औषधं मोफत उपलब्ध आहेत.

 

एच.आय.व्ही. असलेल्या आईने स्तनपान अजिबात करू नये, असे आहे का?…

एच.आय.व्ही. असलेल्या आईने स्तनपान अजिबात करू नये, असे आहे का?…

आईच्या दुधातून बाळाला एच.आय.व्ही.ची लागण होऊ शकते, हे खरे असले तरी होतेच असेही नाही. बाळासाठी आईच्या दुधाचे फायदे बघता, एच.आय.व्ही.ची लागण होईल म्हणून स्तनपान न देणे धोकादायक आहे. जगभर केलेल्या विविध अभ्यासातून ‘बाळाला आईचे दूध मिळाले तर बाळाची वाढ सर्वात चांगली होते व बाळ निरोगी राहते’ हेच अधोरेखित झाले आहे.

आता तर, प्रभावशाली औषधे उपलब्ध आहेत. विशिष्ट औषधे आईने घेतली किंवा बाळाला देत राहिली तर स्तनपानातून होणार्‍या लागणीची शक्यता खूपच कमी करता येते.

स्त्रियांना दर महिन्याला येणार्‍या मासिक पाळीच्यावेळी होणार्‍या रक्तस्रावातून विषाणू शरीराबाहेर टाकले जातात आणि त्यामुळे त्यांचा आजार लवकर वाढत नाही,…

स्त्रियांना दर महिन्याला येणार्‍या मासिक पाळीच्यावेळी होणार्‍या रक्तस्रावातून विषाणू शरीराबाहेर टाकले जातात आणि त्यामुळे त्यांचा आजार लवकर वाढत नाही,…

नाही. हा एक गैरसमज आहे.  

एकदा लागण झाल्यावर स्त्रिया काय किंवा पुरुष काय, कुणाचाही आजार सर्वसाधारणपणे एकाच वेगाने वाढतो. अनेकदा असे घडते की स्त्रियांना त्यांच्या पतीकडून लागण झालेली असते. त्यामुळे पुरुषांच्या मानाने त्यांच्या पत्नीची लागण उशीरा होते. एच्.आय्.व्ही.ची लागण झाल्यानंतर पुढच्या ८-१० वर्षात उपचार न मिळालेल्या रुग्णाचा आजार हळूहळू वाढत जाऊन एड्सपर्यंत पोचतो. पुरुषांमध्ये लागणीचे निदान अनेकदा त्यांना लक्षणे दिसू लागल्यावर होते आणि पतीच्या लागणीचे वृत्त समजल्यावर पत्नीची तपासणी होते. त्यावेळी समजा पत्नीच्या लागणीचे निदान झाले तरी तिची तब्येत तुलनेने चांगली असते. स्त्रियांमधील लागणीचे निदान गर्भारपणात होते तेंव्हाही बर्‍याच स्त्रिया आजाराच्या दृष्टीने बर्‍याच आधीच्या टप्प्यावर असतात. निदान वेळेवर झाल्याने अनेकदा स्त्रियांचे उपचारही वेळेवर सुरू करता येतात आणि पुढचे गंभीर आजार किंवा मृत्यू टाळता येतो. असे फायदे पुरूषांच्या मानाने स्त्रियांना जास्त मिळतात इतकेच.

याचा मासिक पाळीशी काहीच संबंध नाही.

मासिक पाळीदरम्यान बाहेर पडणा-या रक्तामुळे घरातील इतर व्यक्तींना एच.आय.व्ही. होण्याचा धोका असतो का?…

मासिक पाळीदरम्यान बाहेर पडणा-या रक्तामुळे घरातील इतर व्यक्तींना एच.आय.व्ही. होण्याचा धोका असतो का?…

घरातील बाईच्या मासिक पाळीमुळे असा कोणताही धोका संभवत नाही. एच.आय.व्ही. हा विषाणू अतिशय नाजूक असल्यामुळे हवा, पाणी, साबण ह्यासारख्या गोष्टींच्या संपर्कात आल्यावर तो लगेचच नष्ट होतो. त्यामुळे लागणीचा धोका अजिबात नाही.

पाळीच्या कपड्यांची स्वच्छता, सॅनिटरी पॅडची योग्य विल्हेवाट, संडास स्वच्छ ठेवणे ह्यासारख्या सर्वांनीच कराव्यात अशा गोष्टी जरूर लक्षपूर्वक कराव्यात.

एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या व्यक्तींनी कोणत्या प्रकारची कामे करावीत?…

एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या व्यक्तींनी कोणत्या प्रकारची कामे करावीत?…

एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारची कामे करायला हरकत नाही. कामामुळे आपला आजार जास्त वाढेल किंवा आपल्यामुळे कामाच्या ठिकाणी कोणाला आजाराचा धोका संभवेल अशी शक्यता अगदी त्रोटक असते.  उदाहरणच द्यायचे तर एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या डॉक्टरने शस्त्रक्रिया करणे टाळावे. शस्त्रक्रियेच्या वेळी वापरायच्या धारदार उपकरणांनी क्वचित डॉक्टरांच्याच हाताला जखम होऊन त्यांचे रक्त रुग्णाच्या शरीरात सोडले जाऊ शकेल, तसे होणे टाळायलाच हवे.

एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या व्यक्तींनी खाण्या-पिण्याबाबत काय काळजी घ्यायला हवी?…

एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या व्यक्तींनी खाण्या-पिण्याबाबत काय काळजी घ्यायला हवी?…

ह्या आजारासाठी म्हणून वेगळी, विशेष अशी कोणतीही पथ्ये नाहीत.
वेळेवर व चौरस आहार घ्यावा. मोड आलेली कडधान्यं, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश आहारामध्ये असावा. मांसाहार करायलाही हरकत नाही. मात्र सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे शिजवून खायला हवेत. जमल्यास फळेही खावीत. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. बाहेरील, उघडयावरचे किंवा शिळे अन्नपदार्थ टाळावेत.

एखाद्या स्त्रीला एच.आय.व्ही.ची लागण असल्यास तिच्या मुलांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे का?…

एखाद्या स्त्रीला एच.आय.व्ही.ची लागण असल्यास तिच्या मुलांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे का?…

होय. कुणा स्त्रीचे एच.आय.व्ही.चे निदान झाल्यावर तिच्या सर्व मुलांची तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांच्या आईचे निदान जरी आत्ता झालेले असले तरी तिला लागण कधीपासून झालेली आहे, हे काही आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आईच्या निदानाच्यावेळी तिच्या 25 वर्षापेक्षा लहान मुलामुलींच्या एच.आय.व्ही.साठीच्या तपासण्या करून घ्यायला हव्यात.

आत्तापर्यंत या बालकांना वारंवार आजारपणं येत नसतील तर हा निकाल निर्दोष येण्याची शक्यता जास्त आहे. तरीही खात्रीसाठी रक्ततपासणीला पर्याय नाही.

एच.आय.व्ही.साठीच्या लसीचे संशोधन कुठपर्यंत आले आहे?…

एच.आय.व्ही.साठीच्या लसीचे संशोधन कुठपर्यंत आले आहे?…

एच.आय.व्ही.साठीच्या लसीचे संशोधन चालू आहे, पण ते अद्याप कुठल्याही ठोस टप्प्याला पोहोचलेले नाही.

सर्वसाधारणपणे लस ही माणसांना एखादा आजार किंवा संसर्ग होऊ नये यासाठी वापरली जाते. जगभरातील एच.आय.व्ही.संबंधीच्या लसींचे संशोधनही ह्याच तत्त्वावर चालू आहे. भविष्यात कधी ही लस बाजारात आली तरी एच.आय.व्ही. नसलेल्या व्यक्तींना लागण होऊ नये यासाठी तिचा उपयोग व्हावा अशीच कल्पना या संशोधनामागे गृहीत धरलेली आहे.

एच.आय.व्ही.साठीची तपासणी कोणी करायला हवी?…

एच.आय.व्ही.साठीची तपासणी कोणी करायला हवी?…

एच.आय.व्ही.ची लागण काही ठरावीक मार्गांनी होऊ शकते. त्यापैकी कोणत्याही मार्गाने आपल्याला लागण झाली असल्याची शंका जरी वाटत असली तर त्या व्यक्तीने आपली तपासणी जरूर करून घ्यावी.

कोणकोणत्या परिस्थितीत एच.आय.व्ही.साठीची तपासणी करायला हवी?…

कोणकोणत्या परिस्थितीत एच.आय.व्ही.साठीची तपासणी करायला हवी?…

 • आपल्या लैंगिक जोडीदाराला एच.आय.व्ही. असल्यास.
 • आईला एच.आय.व्ही.ची लागण असल्यास तिच्या (किमान 25 वर्षांपर्यंतच्‍या) सर्व मुलांची.
 • अनोळखी व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध आलेले असल्यास.
 • आपल्या लैंगिक जोडीदाराला इतर लिंगसांसर्गिक आजार असल्यास.
 • स्वतःला लिंगसांसर्गिक आजाराची काही लक्षणे दिसत असल्यास.
 • शिरेवाटे मादक द्रव्ये टोचून घेण्याचे व्यसन असल्यास.
 • क्षयरोग, नागीण ह्यासारखे आजार झाले असल्यास.  
 • सर्व गरोदर स्त्रियांनी.
 • काही काळापासून वारंवार वेगवेगळे आजार (सतत सर्दी-खोकला होणे, सतत ताप येणे, वारंवार जुलाब होणे, ज्वर उठणे) होत असल्यास व हे आजार नेहमीच्या उपचारांनी बरे होत नसल्यास.
 • आरोग्यसेवकाने रुग्णाला आरोग्यसेवा देताना अपघाताने सुया अथवा धारदार उपकरणाने जखम होऊन रुग्णाच्या रक्ताशी संपर्क आलेला असल्यास.
 • विवाहापूर्वी.
 • मूत्रपिंड अथवा इतर अवयव बदलले असल्यास.
 • गेल्या काही वर्षात रक्त भरले गेले असल्यास.
कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी बहुतेक सर्व रुग्णालयांत रुग्णाची एच.आय.व्ही.साठीची तपासणी केली जाते.

 

स्वतःला एच.आय.व्ही.ची लागण होऊ नये यासाठी काय करता येईल?…

स्वतःला एच.आय.व्ही.ची लागण होऊ नये यासाठी काय करता येईल?…

 • अनधिकृत रक्तपेढीतून रक्त घेणे टाळावे.
 • अनोळखी व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत.
 • अनेक व्यक्तींशी किंवा ज्‍या व्‍यक्‍तीचे अनेकांशी संबध असू शकतील अशा व्‍यक्‍तीशी असुरक्षित लैंगिक संबंध टाळावेत.
 • इंजेक्‍शनसाठी वापरल्या जाणार्‍या सुया व इतर उपकरणे निर्जंतुक केली आहेत ना याची खात्री करून घ्यावी.
 • गरोदर स्त्रियांना एच.आय.व्ही. असेल तर बाळांना ही लागण होऊ नये ह्यासाठी त्यांनी औषधे व उपचार घ्यावेत.
 • रुग्णसेवा देणार्‍यांनी सार्वत्रिक दक्षता घ्याव्यात.

रस्त्यावरच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत केली तर मला एच.आय.व्ही. होण्याचा धोका आहे का?…

रस्त्यावरच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत केली तर मला एच.आय.व्ही. होण्याचा धोका आहे का?…

अशा प्रकारची मदत केल्यामुळे तुम्हाला कोणताही धोका नाही. एच.आय.व्ही. असलेल्या रक्ताचा प्रवेश दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात झाला तरच एच.आय.व्ही.ची लागण होऊ शकते. मदत करणार्‍या व्यक्तीला जर ताज्या, उघड्या जखमा नसतील तर कोणतेच रक्त त्या व्यक्तीच्या शरीरात जाऊ शकत नाही. रक्तस्राव होत असलेल्या व्यक्तीला मदत करताना आवश्यक वाटले तर प्लॅस्टिकच्या हातमोज्याचा किंवा पिशवीचा वापर करावा, म्हणजे एच.आय.व्ही. होण्याचा धोका राहणार नाही.

भारतात किती लोकांना एच.आय.व्ही.ची लागण आहे?…

भारतात किती लोकांना एच.आय.व्ही.ची लागण आहे?…

भारतात साधारण 24 लाख व्यक्ती एच.आय.व्ही.सह जगत आहेत. भारतात एच.आय.व्ही.चं प्रमाण लोकसंख्‍येच्‍या 0.3% इतकेच आहे, म्हणजे प्रत्येक 1000 व्यक्तींमागे 3 व्यक्तींना एच.आय.व्ही.ची. लागण असल्याचे दिसते. जगभरातल्या इतर काही देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. परंतु, भारताची लोकसंख्या जास्त असल्याने एच.आय.व्ही.ची लागण असणार्‍या लोकांची संख्या बघितली तर मात्र जगातील देशांमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

 

Prayas-Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune - 411 004, Maharashtra, India.
Tel.: 8605882649 / 8087015726  E-mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.