Ongoing Research Youth in transition Marathi

Youth in transition Marathi

युथ इन ट्रान्झिशन

शहरी भागात राहणार्‍या अविवाहित तरूण मुला-मुलींमध्ये, लैंगिक आरोग्यासंदर्भातील असणारे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रयासतर्फे एक संशोधन अभ्यास हाती घेण्यात आला आहे.

अभ्यासाचा उद्देश:

प्रेम, नातेसंबंध, लैंगिकता या सर्व वैयक्तिक गोष्टी आहेत आणि आपल्या सर्वांना अतिशय जवळीकीच्या वाटणाऱ्याही! या संदर्भातल्या आवडीनिवडी, कल, भावना, निर्णय हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. कोणी नात्यांमध्ये असायचं ठरवतं, तर कुणाला ते नको असतं. कोणी बांधिलकी मानतं, तर कोणाला ती अमान्य असते. आपले हे निर्णय काळानुसार बदलूही शकतात. कधी सामाजिक परिस्थितीच्या दबावामुळे, तर कधी स्वतःच्या विचार व मतांमुळे. आताच्या काळात तर नवनवीन तंत्रज्ञान, संपर्काची साधनं आणि जगण्याचे बदलते निकष यांचाही यावर प्रभाव पडतो आहे. हा एकूणच विषय प्रत्येकासाठीच खूप महत्वाचा, आपुलकीचा असतो. पण तरीही याविषयी उघडपणे बोलणं होत नाही. विशेषतः याच्याशी जोडलेल्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याच्या प्रश्नांविषयी, गरजांविषयी तर फारच कमी बोललं जातं आणि समजून घेतलं जातं. अविवाहित तरूण मुलामुलींसाठी तर या विषयांवर बोलण्यासाठी तशी मोकळीकच नसते. पण ते गरजेचं मात्र आहे. प्रेम, नातेसंबंध आणि लैंगिकता या सगळ्याचा विचार करता आजच्या तरुणाईच्या काय गरजा आहेत व त्या पूर्ण करण्यासाठी काय करता येईल हे समजून घेणं हा या अभ्यासाचा उद्देश आहे. पण त्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की हे नातेसंबंध सुरू कसे होतात, त्यांच पुढे काय होतं, त्यातून काही जोखमी आहेत का आणि ह्या जोखमी टाळता याव्यात यासाठी ही तरूण मुल-मुली तयार आहेत का? तसेच शिक्षण, करियर, स्थलांतर, मानसिक आरोग्य, व्यसन, इत्यादी गोष्टींचा याच्याशी काही संबंध आहे का हेही आम्हांला समजून घ्यायचे आहे.

हा अभ्यास कसा केला जाणार आहे?

अभ्यासात भाग घेण्यास उत्सुक व पात्र असलेल्या व्यक्तींची मुलाखत घेण्यात येईल. ही मुलाखत साधारण दीड ते दोन तास चालेल. मुलाखतीत तुम्हाला तुमचे शिक्षण, लहानपणीचे अनुभव, करियर, कोणत्याही कारणासाठी झालेल्या स्थलांतराबद्दल तसेच मैत्री, रिलेशनशिप्स, मानसिक  आरोग्य, व्यसन, इत्यादी संदर्भात प्रश्न विचारले जातील. मुलाखतीत भाग घ्यायचा किंवा नाही हा निर्णय पूर्णपणाने तुमचा असेल. अभ्यासादरम्यान घेतलेली तुमची सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवली जाईल व तुमचे नाव तुम्ही दिलेल्या माहितीशी कधीही जोडले जाणार नाही. सहभागींना त्यांच्या जाण्यायेण्याचा खर्चही दिला जाईल.

 ह्या अभ्यासात कोण सहभागी होऊ शकते?

  • अविवाहित
  • २०-२९ वयोगटातील  
  • किमान मागच्या ६ महिन्यांपासून पुण्यात राहणारी
  • किमान १२ वी किंवा १० वी नंतर किमान २ वर्षाचा डिप्लोमा पर्यंत शिक्षण पूर्ण झालेली

अशी व्यक्ती अभ्यासात सहभाग घेऊ शकते.

संपर्क

तुम्हाला अभ्यासात सहभाग घ्यायची इच्छा असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर या लिंक वर जा व तुम्हाला कसा संपर्क करावा त्यासाठीची माहिती भरा किंवा आम्हाला ७७७५००४३५०/०२०-२५४४१२३०/२५४२०३३७ या नंबर वर फोन करा किंवा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.  वर मेल करा.

जरी तुम्ही या अभ्यासात भाग घेऊ शकला नाहीत तरी तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा इतर तरूणांना या अभ्यासात भाग घेण्यासाठी पाठवू शकता.

 

Prayas-Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune - 411 004, Maharashtra, India.
Tel.: +91-20-25441230/65615726 Tel./Fax: +91+20-25420337 E-mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.